जामखेड तालुक्यात कोरोनाचा वेग वाढला असुन
बुधवारी जामखेड पोलिस स्टेशनमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याने तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.बुधवारी दुपारी दोन जण पाॅझिटिव्ह आल्यानंतर सायंकाळी पुन्हा सात कोरोना रूग्णांची तालुक्यात भर पडली आहे. बुधवारी दिवसभरात तब्बल 09 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डाॅ युवराज खराडे यांनी दिली.
मंगळवारी जामखेड पंचायत समितीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता बुधवारी जामखेड पोलिस स्टेशनमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. येथील एक तरूण पोलिस कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आले आहेत. बुधवारी आरोग्य विभागाने दिवसभरात 95 नागरिकांच्या रॅपिड अँटीजेन चाचण्या केल्या यामध्ये एकुण 9 जण पाॅझिटिव्ह तर 86 जण निगेटिव्ह आढळून आले आहेत. कोरोना बाधितांमध्ये 6 पुरूष व तीन महिलांचा समावेश आहे. बुधवारी जामखेड शहरातील तपनेश्वर परिसरात 03 व जामखेड पोलिस स्टेशन 01,खर्डा 03, पिंपळगाव आळवा 02 असे 09 जण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती वैद्यकीय अधिक्षक डाॅ युवराज खराडे यांनी दिली आहे.
जामखेड तालुक्यात कोरोनाने आता रौद्ररूप धारण केले आहे. तालुक्यात मागील पंधरा ते वीस दिवसांपासून रोज कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. तालुक्यातील जवळपास 20 ते 25 गावांमध्ये आजवर कोरोना पोहचला आहे. रोज वाढणार्या रूग्णसंख्येमुळे जनता भीतीच्या सावटाखाली जगत आहे. शहरात सर्वाधिक रूग्ण संख्या झाली आहे.कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शहरात जनता कर्फ्यूचा पर्याय समोर आला परंतु याला विरोधाचे लागबोट लागले. पाच दिवसांपासून सुरू असलेल्या जनता कर्फ्यूला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.त्यातच रस्त्यांवरील अनावश्यक गर्दी कमी होताना दिसय नाहीये. यामुळे कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे.
- ब्युरो रिपोर्ट - जामखेड टाईम्स